Sinking in Love with रंगून!

विशाल भारद्वाज यांचे अत्तापर्यंतचे सगळेच पिक्चर मला कमालीचे आवडतात कारण त्यांचा प्रत्येक पिक्चर एक वेगळीच कहाणी सांगतो आणि प्रत्येक पिक्चर मध्ये प्रेमाचे आगळे वेगळे रंग बघायला मिळतात . आत्ता पर्यंत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये “रंगून “हा रोमँटिक कॅटेगरीच्या अत्यंत जवळ जाणारा. ज्युलिया ( माझी आवडती कंगना ), रुसी ( सैफ ) आणि जमादार नवाब मलिक ( शाहीद) ह्या तीन मुख्य पात्रांच्या नजरेतून प्रेम ह्या भावनेचे त्यांनी त्यांच्या परीने अनुभवलेले आणि जगलेले क्षण हा रंगून ह्या चित्रपटाचा आत्मा आहे . बाकी हि गोष्ट घडते १९३५ ते १९४५ ह्या काळा दरम्यानच्या वर्ल्ड वॉर २ च्या पार्श्वभूमीवर जेंव्हा एकीकडे गांधीजींची अहिंसेची चळवळ जोर धरू लागते आणि दुसरीकडे सुभाष चंद्र बोस आझाद हिंद सेनेची स्थापना करून जपानच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची बांधणी करत असतात. आणि ह्या मध्ये ही तीन पात्रं , त्यांची गोष्ट सुंदर पद्धतीने गोवली जाते . ह्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे ह्या तिघांची आयुष्यं एकमेकांमध्ये गुंतलेली असली तरी आपल्याला ती तितकीच स्वतंत्र , ठळक आणि तरीही अगदी शेवट पर्यंत कुठेतरी एकमेकांत घट्ट रुतलेली भासतात.

ह्या गोष्टीतलं मुख्य पात्र म्हणजे ज्युलियाचं . १९३५ मध्ये हंटरवली ह्या चित्रपटात काम केलेल्या मेरी इव्हान्स वाडिया म्हणजेच फिअरलेस नादियाशी काहीसं मिळतं जुळतं. पण विशाल भारद्वाज आणि स्क्रीनप्ले लिहिणारे मॅथ्यू रॉबिन्स ह्यांच्या लेखणीची किमया हि कि त्यांनी ह्या वरून एक अत्यंत रंजक अशी गोष्ट गुंफली आहे . ह्या तिघांनी आपापल्या परीने अनुभवलेले कधी हळुवार, कधी प्रखर – जहाल , कधी अत्यंत संवेदनशील, मूक तर कधी वेडाची परिसीमा गाठणारे, जगाला व समाजाला ओरडून सांगणारे, कधी वाऱ्याची सौम्य झुळूक तर कधी वादळाच्या झंझावाता सारखे, कधी ध्येयाने पछाडलेले तर कधी प्रेमाने पछाडलेले, कधी दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारे तर कधी प्रेमाखातर जीव घेऊ बघणारे, कधी प्रेमाच्या चौकटीत अडकलेले तर कधी प्रेम ह्या शब्दाच्या पलीकडे पोहोचलेले…असे प्रेम आणि त्याच्या कित्येक रंगांनी अन् छटांनी मंत्रमुग्ध करणारा अनुभव रंगून आपल्याला देऊन जातो . कंगना , शाहिद आणि सैफ या तिघांनीही दमदार अभिनय केला आहे . शहीदने बऱ्याच काळानंतर अत्यंत संयमित अभिनय केला आहे अणि कंगना पुन्हा एकदा किती मुरलेली अभिनेत्री आहे हे सिद्ध झालं आहे .

सगळाच चित्रपट विशेषतः पूर्वार्ध हा सुंदर कवितेसारखा बहरत जातो, काहींना हा संथपणा कंटाळवाणा वाटूही शकतो पण मला विशाल भारव्दाजच्या चित्रपटांचा हाच प्लस पॉइंट वाटतो . तो पॉइज आणि पडद्यावर साकारलेली शाहिद आणि कंगनाची प्रेम कहाणी अत्यंत विलोभनीय वाटते. तसंच सैफ आणि कंगनाची प्रेम कहाणी देखील आपल्या आत कुठेतरी पोहोचते आणि मग आपण चूक – बरोबर, कुणाचं प्रेम अधिक खरं , सरस हे तोलायचा प्रयत्न करत असतानाच क्लायमॅक्स आपल्याला हादरून टाकतो. प्रेम ह्या संकल्पनेच्या परिसीमा ओलांडून डोळे भिजवणारा हा शेवट असला तरी चित्रपट गृहाच्या बाहेर पडताना आपल्या चेहेऱ्यावर चेहेऱ्यावर हसू पसरलेलं असतं कारण शेवट काहीही असो जिंकतं ते प्रेम. आणि केवळ ह्या शेवटामुळे सैफची भूमिका अधिक गहिरी आणि त्याचं प्रेम मनात घर करून बसतं .बाकी सुफीमय अश्या ह्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा. शाहिदचा आणि सैफ चा एक डायलॉग लक्षात राहतो. सैफ कंगनाला म्हणतो ” मुहोब्बत बहोत छोटा लब्ज है , मेरी जान बसी है तुममे ” आणि कंगना जेंव्हा शाहिदला विचारते ” अपनी जान से भी किमती कुछ और है क्या ?” तेंव्हा तो उत्तरतो ” है , के जिसके लिये मरा जा सके”…. काळजात रुतणारे हे डायलॉग्स आणि गुलज़ार साहेबांच्या लेखणीतून झिरपणारी गाणी कहर करतात . अणि काळीज पोखरून टाकतं ते अरिजीतने आणि माझ्या अत्यंत आवडत्या रेखा भारद्वाज यांनी गायलेलं अणि गुलजार साहेबांच्या शब्दांनी मंतरलेलं गाणं ज्याच्या उल्लेखाशिवाय हि पोस्ट अणि अनुभवलेलं प्रेम अपूर्ण राहील .

सुफी के सुल्फ़ेकी लौ उठ के केहती है
आतिश ये बुझके भी जलती ही रेहती है
यह इश्क है ……..यह इश्क है।

Advertisements

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!
This entry was posted in रंगून! and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s