सफल प्रेमाच्या असफल गोष्टी – ६

तिने जागं होताना सवयीने हात त्याच्या अंगावर टाकला. डोळे उघडताना सगळ्यात आधी मला तुझा चेहेरा दिसायला पाहीजे हा तिचा हट्ट असायचा. जाग येतानाचा क्षण फार विलक्षण वाटायचा तिला. झोपेतून जागं होतानाचे ते काही सेकेंद मन एकदम निरभ्र असतं आपलं. ना काल सरून गेलेल्या दिवसाचं ओझं असतं तेंव्हा मनावर ना एका नव्या दिवसाची सुरवात करायची आहे ह्याचं दडपण. अर्धवट डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघणं, त्याच्या गालावरून हलकेच हात फिरवून, त्याच्या दाढीवर हळुवार बोटं फिरवून शेवट त्याच्या ओठांवर करून दिवस सुरु व्हायचा तिचा. पण आज मात्र तो बाजूला नव्हता. दिवस सुरु झालाच मुळी मणभर ओझं घेऊन.

मनाने साथ नाही दिली तरी आपलं शरीर किती सिन्सिअरली रोजच्या गोष्टी करत असतं याची जाणीव तिला झाली. फ्रेश होऊन कॉफी करायला तिने घेतली. चहाची निस्सीम भक्त असणारी ती आज कॉफीशिवाय दिवसही सुरु करू शकत नव्हती. एखाद्याला आपलंस करावं म्हणजे किती ह्याचं काही मोजमाप असतं का असा प्रश्न पडला तिला. खास तमिळनाडू मधल्या येरेकाउड्ड मधून त्याच्या आवडीची कॉफी पावडर मागवून घ्यायचा तो. मग रोज रात्री न चुकता स्टीलच्या फिल्टरमध्ये तो ही कॉफी पावडर आणि पाणी टाकून ठेवायचा. ते डिकक्शन आणि दूध घालून उकळलेल्या कॉफीचा घमघमाट सकाळी सगळं घर व्यापून टाकायचा आणि मग तिच्याही नकळत हा घमघमाट तिच्या आयुष्याचा एक भाग बनून गेला. एव्हाना तिच्या कॉफीला उकळी आली होती, तिने चटकन गॅस बंद केला. भावना उतू जात असताना असं एखादं स्विच मिळेल का आतला विस्तव बंद करणारं असाही विचार तिच्या डोक्यातून चमकून गेला आणि का कोण जाणे तिने ते फिल्टर, कॉफी पावडर सगळं एका पिशवीत गुंडाळून ठेवलं. आज घरी येताना चहाची पावडर घेऊन येऊया असं तिनं स्वतःला बजावलं. इतकं अडकायचं नाही ठरवलं होतं आपण पण मग तरीही का अडकतो आपण असे नऊशे नव्याण्णव प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होते. आज नकोच जायला ऑफिसला असं म्हणून तिने एक फोन करून तब्येत बरी नसल्याचं कळवलं आणि पुस्तकांच्या शेल्फकडे वळली.

तो त्याच्याबरोबर पुस्तकंही घेऊन आला होता. म्हणाला होता माझ्याबरोबर आता यांनाही जागा द्यावी लागेल तुला तुझ्या आयुष्यात. तेंव्हा फार सहज वाटलं होतं ते सगळं पण आज तो नाहीये तर कसं सगळं जीवावर उठल्यासारखं झालंय. वेगळं होताना फार समंजस असल्याचा आव आणला आपण.. पण खरंच आहोत का समंजस असा प्रश्न पडला तिला. तुझं राहीलेलं सामान परत एका बॉक्समध्ये घालून ठेवते, सवडीने घेऊन जा असं किती सहज म्हणालो काल त्याला आपण!आज उद्यात येतो म्हणाला. त्याचं नक्की काय काय राहीलंय आपल्याकडे याचा हिशोब कसा लावणार आहोत आपण? तो त्याच्या वस्तू घेऊन जाईलही पण आठवणी …त्यांचं काय? त्या पुसून टाकून रितं होता येणार आहे का आपल्याला?

मनातले सारे प्रश्न बाजूला ठेवून त्याचं सामान भरायला तिने सुरवात केली. एक एक करत पुस्तकं भरत होती ती. एका पुस्तकात बुकमार्क घालून ठेवलं होतं त्याने. तिने सहज म्हणून ते पान वाचायला घेतलं. पुस्तक वाचताना आवडत्या वाक्याच्या खाली रेष मारायची त्याची सवय तिला अजिबात आवडायची नाही. ‘किती घाण दिसतं ते पुस्तक’ ती त्याला म्हणाली होती. दुसरं कोणी वाचायला घेतलं तर त्याला कसं वाचावंसं वाटेल ते? त्यावर तिला जवळ ओढून तो म्हणाला होता ‘माझं आहे ते पुस्तक.. त्यातले अनुभव माझे त्याच्यावर दुसऱ्या कोणाचाही हक्क नाहीये. मी हवं ते करीन’ आणि त्याने पेनने तिच्या ओठाखाली रेष मारली. ती वितळून गेली होती तेंव्हा.. आज मात्र त्याचा काय अर्थ लावावा हे समजत नव्हतं. हे सगळं डोक्यात चालू असताना त्या पानावरच्या निळी रेष मारलेल्या ओळीवर तिचं लक्ष गेलं… “Do not allow me to forget you.” मार्केजचं ‘ऑफ लव्ह अँड आदर डेमन’ ह्या पुस्तकातलं वाक्य! ‘मला तुझा विसर पडेल असं घडू देऊ नकोस’…. असं शक्य आहे का? कोणाला जर एखादं नातं नको असेल, इमोशनल गुंतवणूक नको असेल आणि नात्यातला जुनेपणा नको असेल तर त्याला थांबवून धरता येऊ शकतं का? विसर पडणे ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. ज्यांना विसर पडतो.. माणसांचा,जागेचा, स्पर्शाचा, आठवणींचा ते किती भाग्यवान लोकं असतील नाही? प्रत्येक वेळेस पाटी कोरी. प्रत्येक अनुभव हा नवीन. किती छान असेल असं जगणं! “काही लोकं ज्या गोष्टी विसरायच्या असतात त्यांनाच आयुष्यभर उराशी बाळगून जगतात.. सॅडीझम दुसरं काय? असं पथेटिक कसं जगू शकतात लोकं?” ती त्याला एकदा म्हणाली होती.. त्यावर ‘वेदनेतूनच आनंदाचा प्रवास होतो’ असं तो तिला हसून उत्तरला होता. आपण त्याला विसरूच शकलो नाही, त्याच्या आठवणी येतंच राहील्या तर कसं होणार आपलं? शरीराला एकवेळ तृप्त करता येईलही पण हे जे मनात काहीतरी गळून पडलं आहे, सतत डोळ्यात पाणी येतं आहे, काहीतरी मागे सुटून गेलं आहे, खोलवर जखम झाली आहे आणि ती भळाभळा वाहते आहे त्याचं काय करणार आहे मी?

अडकून पडू नकोस असं एकशे अकरा वेळेला बजावलं होतं पण त्याचा उपयोग झाला आहे का? एव्हाना संध्याकाळ होत होती. वाफाळता चहा हातात होता. पण आता चहाची ती चव सुद्धा नको वाटत होती. सवय.. कोणत्याही गोष्टीची सवय होऊ द्यायची नाही असं आपण कितीदा घोकलं होतं पण ठरवून जर भावनांना कंट्रोल करता आलं असतं तर मग काय राहीलं असतं? चहा बाजूला ठेवला तिने.. प्रेमाची किंमत चुकती करावी लागते हे उमजत होतं तिला .. .तिने एक एक करत सगळं सामान भरलं. त्याचा एक शर्ट मात्र तिने स्वतःकडेच ठेवून घेतला. रात्रीचा काळोख जसा जसा गडद होत गेला तसं तसं तिचं मन कावरं बावरं व्हायला लागलं. सगळं अवसान गळून पडलं तिचं. त्याला मेसेज लिहायला घेतला होता पण कुठून सुरवात करावी तिला कळेचना.

आज, तू नाहीयेस तर कशातच मन लागत नाहीये माझं.. एखाद्यावर जडतं का रे इतकं प्रेम? वेगळे होणार आहोत हे दोघानींही ठरवलं आहे आपण… पण जमणार आहे का मला ते अशी शंका यायला लागली आहे. प्रेम करण्यासाठी एकत्र राहावंच लागतं का? एकमेकांपासून दूर राहून आत्म्याला स्पर्श करणारं प्रेम करू शकू का आपण? वरवरचं वाटत होतं हे सगळं आधी.. इतकं गहीरं कसं झालं रे? की माझ्या मनाचे चोचले आहेत हे? हे प्रेम वगैरे नसेलच का प्रत्यक्षात? हे केवळ शरीराच्या वासनेपुरतंच मर्यादित असेल का? का हे पोहोचलं आहे माझ्या आत्म्यापर्यंत? दुसरा कोणी येऊ शकेल का ह्या रिकाम्या जागेत आता? अशा जागा भरता येतात का रे? माणसांना असे पर्यायी माणसं असू शकतात? तुला मिळेल का माझ्याजागी कोणी दुसरा पर्याय? एखादं नातं नको होऊन जातं जे आधी खूप हवंहवंसं वाटत असतं म्हणजे नेमकं काय होतं रे? हाडामासाच्या,मन असणाऱ्या एखाद्या जीवावरून अचानक आपलं मन उडून जातं तेंव्हा नक्की काय होतं असेल रे? असं एका झटक्यात येतं का ठरवता की आता नको हा माणूस माझ्या आयुष्यात? इतकं अनप्रेडिक्टेबल आणि तकलादू असतं प्रेम? तुझ्याशिवाय राहताही येत नाहीये आणि तुझ्याबरोबर राहणंही शक्य नाहीये. काय करायचं अशा वेळी? परत एकदा करायचा का प्रयत्न एकत्र राहायचा? हे समंजसपाणाचं ढोंग का करावं मी? म्हटले तुला नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय.. हक्क आहे माझा तुझ्यावर.. तर चालेल का ते? आणि त्याच्याने पडणार आहे का फरक? मला विसरू देऊ नकोस हे किती खोटं विधान आहे. असं कोणी कोणाला बांधून नाहीरे ठेवू शकत. वर्षानुवर्षे एकत्र राहून दोघांना कधीकाळी आपलं प्रेम होतं एकमेकांवर ह्याचा सुद्धा विसर पडतोच की ! मग शाश्वत आहे तरी काय? मेसेज मोठाच होत चालला होता. तिने टाईप करणं थांबवलं. ही वेळ योग्य आहे मेसेज पाठवण्याची. एव्हाना घरी येऊन पुस्तक वाचत बसला असणार तो. तिने पाठवला मेसेज आणि त्याचा शर्ट घालून ती झोपायला आली. शफाकत अलीची गझल.. नासिर काजमी यांचे शब्द.. गझल ऐकता ऐकता तिचे डोळे वहात होते.

दिल धड़कने का सबब याद आया
वो तिरी याद थी अब याद आया

आज मुश्किल था सँभलना ऐ दोस्त
तू मुसीबत में अजब याद आया……….

त्याच्या मोबाईलमध्ये लाईट लागला.. फार आशेने त्याने मोबाईल उघडला. “तुझं राहीलेल सामान भरून ठेवलं आहे, घेऊन जा”. फक्त एकच ओळ.. त्याने पुन्हा पुन्हा ती वाचायचा प्रयत्न केला. डोळ्यात साचलेल्या पाण्यामुळे त्याला आता अक्षरं अस्पष्ट दिसायला लागली. त्याने मोबाईल बाजूला भिरकावला. पाकिटातून तिचं कानातलं काढून उशीच्या बाजूला ठेवलं.. झोप येण्याची वाट तो बघू लागला…
©सानिया भालेराव
८/४/२०१९
P.C.: Painting ‘Degree of seperation’ By Job Klijn

degree of seperation

Advertisements
Posted in सफल प्रेमाच्या असफल गोष्टी | Tagged , , , , , | Leave a comment

सफलतेच्या फूटपट्ट्या

आजकाल सगळं जग एकाच गोष्टीच्या मागे पळतं आहे. सफलता.. सक्सेस.. सगळ्यांनाच जिंकायचं आहे. पहिल्या झटक्यात यश मिळवणं याचं अप्रूप वाढत चाललं आहे. कितीदा हरलात ते महत्वाचं नाही.. प्रयत्न करत राहिलात ते महत्वाचं.. हे वाक्य फक्त कोट पुरतं उरलं आहे. प्रयत्न करत राहायला, अपयश पदरात पडून घ्यायला वेळ कोणाकडे आहे. यश जे शिकवतं, देतं ते अपयश काय शिकवणारं? सतत कोणत्या ना कोणत्या शर्यतीत असल्यासारखं लोक पळत आहेत.. कशाच्या तरी मागे.. अगदी लहानपणापासून हेच शिकवलं जातंय.. स्पर्धा,नंबर, मेडल, पहिल्या तीनात., पहिल्या पाचात, हे शिक, ते शिक, हे कर, तेही कर, जिंक.. जिंकणं महत्वाचं.. सगळीकडे नंबर महत्वाचे झालेत.. पगाराचे आकडे. बँकेतल्या अकाउंट मधले लांबलचक नंबर्स, हुशारी, गुणवत्ता मोजतानाचे आकडे, लोकप्रियतेचे फसवं आकडे,शरीरसुद्धा यातून सुटलं नाहीये, त्याचं सौंदर्य सुद्धा नंबरांमध्ये अडकून बसलं आहे, तीच अवस्था हुशारीची..नात्याची सफलता सुद्धा वर्षांच्या फुटपट्टीवर मोजली जातेय.. सगळी मोजमापं पक्की.. एक चौकट.. सगळीकडे.. त्यात बसलात तर फिट.. नाहीतर सामान्य.. ऍव्हरेज.. बेस्ट नाही.. 

कोण ठरवतं ही मोजमापं? सगळेच चौकटीत बसले तर वेगळपण काय? शर्यतीत जीव तोडून पळताना आजूबाजूचा सुंदर देखावा आपण बघू शकतो आहोत का? चिमण्यांचे आवाज, झाडाचे वेगवेगळे रंग, फुलांचा वास, वाऱ्याची झुळूक, थंडगार चांदणं.. हे अनुभवणं.. जगणं.. हे कुठेतरी मागे पडतंय का? पाहिलं, दुसरं, तिसरं.. यापुढे बऱ्याच गोष्टी असतात.. आकडेवारीत, नंबर गेम मध्ये अडकलेल्या कित्येक गोष्टी.. नाती, माणसं, प्रेम, मैत्री, यश, सुंदरता, आनंद, कला, खेळ, बुद्धिमत्ता ..आणि मोजमाप करता न येणाऱ्या बेशकिमती गोष्टी. कोणत्याही फुटपट्टीवर मोजता न येणाऱ्या.. असीम, अनादी, निर्लेप, यश अपयशाची भीती नसणाऱ्या, जिंकणं आणि हरणं याची तमा न बाळगणाऱ्या.. अढळ,जेन्युईन,चौकटीत न बसणाऱ्या, आपल्या असण्याची जाणीव सहज करून देणाऱ्या, देखाव्याची गरज नसणाऱ्या.. मनाच्या कोपऱ्यात तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीसारख्या..स्वतःतलं स्वत्व टिकवणाऱ्या…जगावेगळ्या..

©सानिया भालेराव

Posted in Random Thoughts | Tagged , , , , , , | Leave a comment

मर्द को दर्द नही होता – MKDNH

‘मर्द को दर्द नही होता’.. MKDNH.. वेड्या माणसाने वेड्या लोकांसाठी काढलेला वेड लावणारा चित्रपट!!

वासन बाला काय प्रकरण आहे हे ज्यांनी रमन राघव पहिला आहे त्यांनाच कळेल. तीन वर्षांपासून MKDNH ची स्क्रिप्ट त्यांच्या डोक्यात घोळत होती. पण हा चित्रपट पूर्ण करेस्तोवर २०१९ उजाडला कारण कोणालाही स्क्रिप्ट ते फायनल प्रोडक्ट हा प्रवास दिसत नव्हता आणि तो अशक्य वाटत होता. स्क्रिप्ट मधला पॉप कल्चरचा धुडगूस, ८०- ९० च्या दशकातल्या बॉलिवूड चित्रपटांचा रेफरन्स आणि एकूणच विचित्र वेडेपणा वाटावा अशी काहीशी स्टोरीलाईन.. त्यामुळे कोणी पैसे लावायला तयार होईना. मग रॉनी तयार झाला आणि २०१८ सालच्या मिडनाईट मॅडनेस सेक्शन मध्ये टोरँटो फिल्म फेस्टिव्हलला या चित्रपटाने पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळवलं. मामी ला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं तरीही चित्रपट मोठ्या पडद्यावर आणता आणता मार्च उगवला आणि त्यात केसरी सारख्या महानायकाच्या चित्रपटाबरोबर हा आल्याने व्यावसायिक गणितात हा चित्रपट अडकला. केसरीचे १० च्या वर शोज आणि MKDNH चे मोजून ३ शोज आणि १५ जणं मी बघितलेल्या शो ला.. काहीतरी वेगळं हवं आहे असं म्हणून जर कोणीतरी ते द्यायचा प्रयत्न करत असेल तर त्यात काय वाईट आहे हे हुडकून काढण्यापेक्षा एक वेगळ्या जॉनरचा चित्रपट बनवल्याबद्दल पाठीवर थाप मारून तो जाऊन बघायला हवा.. असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे नाहीतर केसरीला रांगा लावणारे आहेतच.. असो.

चित्रपटाची कथा अगदी थोडक्यात जरी सांगितली तरी स्पॉयलर्सची खूप शक्यता आहे म्हणून टाळते आहे. यात डीप फिलॉसॉफी नाही.. याउलट एका डायलॉग मध्ये रुमी वरून जी थट्टा केली आहे तो सिन भारी वाटला.. यातला नायक सूर्या (अभिमन्यू दासानी) याला CIP म्हणजे कॉन्जेनिटल इंसेन्सिटिव्हिटी टु पेन हा आजार असतो आणि म्हणून मर्द को दर्द नहीं होता.. हेच काय ते लॉजिक.. त्यानंतर त्याचा सुपर वॉरिअर बनण्याचं खूळ, त्यात साथ देणारे त्याचे आजोबा, त्याची मैत्रीण सुप्री( राधिका मदन) जी ऍक्शन सीन्स कन्व्हीन्सिंगली करते, ट्वीन ब्रदर्स आणि इतर गोष्टी या एल्लोजिकल वाटणाऱ्या असल्या तरीही आपण त्या विश्वाचा भाग बनून जातोच. गुलशन देवय्या याने केवळ कमाल काम केलं आहे.
मध्यन्तरापूर्वीचा भाग तर बेहेतरीन असाच.. सुप्रीची एंट्री ज्या गाण्यावर होते आणि तो जो काही सिन जमून आलाय त्या एका सीनसाठी पुन्हा एकदा चित्रपट पाहावा अशी वेडाची लहर मला हे लिहिताना येते आहे. हे असलं बऱ्याच वर्षात हिंदी चित्रपटात अनुभवलं नाहीये. कमाल डोकं लावलं आहे दिग्दर्शकाने.. मध्यन्तनंतर काही जणांना कदाचित थोडं आऊट ऑफ स्पेस वाटू शकेल कारण गोष्ट आपल्याला लॉजिक पासून खूप दूर घेऊन जाते पण मला म्हणून विचाराल तर ते नक्कीच पोटात घालण्यासारखं आहे कारण चित्रपट जो फिल देतो ते मला महत्वाचं वाटलं..

क्वर्की डायलॉग्ज, मॅड म्युझिक,रेट्रो क्लिशेड बॉलिवूड फिल,नखरेवाली हे गाणं कायमसाठी आता वेगळ्या कारणाने आठवण करून देणारं इंटेलिजंट डायरेक्शन, काहीसा टॅरंटिनो,रॉड्रिग्ज फील, अंदाज अपना अपना ते डेडपूलचा नॉस्टॅलजिया आणणारं कथानक आणि खूप सारा मॅडनेस.. MKDNH म्हणून स्पेशल.. मस्त हसून घेतलं, काय्ये हे असं म्हणून पण घेतलं आणि स्वतः चित्रपट बनवणाऱ्यानेच क्लिशेड आहे असं म्हंटल्यावर आता आपण काय म्हणणार असं बोलून एन्जॉय पण केलं.. तऱ्हेवाईकमी वेडगळ, विचित्र पण तरीही प्रेम, नाही म्हणालात तरी रोमँटिक, क्युट, सिन्सिअर आणि थोडी इल्लोजिकल फिलॉसॉफी असणारी ही गोष्ट.. वेदना होणं.. जाणीव होणं हे किती महत्वाचं असू शकतं असा विचार अलगदपणे आपल्याला जाणवून देणारी..

वासन बाला सारख्या दिग्दर्शकाचं कौतुक करायला हवयं कारण स्वतः मॅड असल्याशिवाय या अश्या जॉनरचा चित्रपट लिहिणं, बाकीचे लोक वेड्यात काढत असताना स्वतःला जे व्हिज्युअल दिसतंय त्यावर विश्वास ठेवणं आणि ते प्रत्यक्षात आणण आणि ते पडद्यावर पाहताना आमच्या सारख्या येड्यांना तोंडात बोटं घालून ते पाहायला लावणं.. शहाणा माणूस हे करूच शकत नाही..आनंदाचं, लहरींचं, वेडेपणाचं आणि थोडी झिगं आणणारं कॉकटेल आहे हे.. काहीतरी हटके हवं असेल तर जरूर टेस्ट करावं असं.. सिर्फ उनके लिये जिनको दर्द होता है.. जे आतून जिवंत आहेत.. त्यांच्यासाठी..

D0kSl0zU0AICagF

 

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , | Leave a comment

फोटोग्राफ…See Beyond Frames!!

रितेश बत्राचा चित्रपट येणार आहे आणि त्यात नवाजुद्दीन आहे.. हे कळल्यापासून ‘फोटोग्राफ’ ची प्रचंड उत्सुकता होती. लंचबॉक्स मध्ये त्याचं वेगळेपण दिसून आलं होतंच पण ज्युलियन बार्न्सच्या माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकावर त्याने जेंव्हा ‘सेन्स ऑफ ऍन एंडिंग’ हा चित्रपट बनवला तेंव्हा तर तो माझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसला. ‘फोटोग्राफ’ हा सुद्धा असाच त्याच्या सिग्नेचर स्टाईलचा चित्रपट.. सगळ्यांना आवडेल असं नाही.. कारण धीम्या गतीने, प्रेमाच्या चकचकीतपणा पासून दूर, झगमगीत दिखाव्यापासून दूर, हाडामासाच्या माणसांचे प्रेम.. जे मुंबईच्या ओबडधोबड गल्यांमध्ये फुलतं, हळुवारपणे आत झिरपत जातं आणि शेवट हा आपल्या आकलनावर सोडतं.. हा प्रवास एक प्रेक्षक म्हणून सगळयांना आवडेलच असं नाही आणि म्हणूनच कमर्शियल गल्लाभरू शकडो क्लिशेज असलेले इल्लोजिकल आणि फक्त करमणूक.. ( ती ही होते का हा प्रश्नच आहे ) ह्या हेतुखातर बनवलेल्या चित्रपटांना गर्दी करणाऱ्या लोकांच्या या महासागरात फोटोग्राफ सारख्या चित्रपटासाठी मी आणि शर्माजी धरून चित्रपटाच्या सेकंड डेला पुण्याच्या चकचकीत सिनेमागृहात मोजून २० लोक होतो.. हे सत्य..

चित्रपट आहे रफी (नवाजुद्दीन सिद्दीकी) या गेटवे ऑफ इंडिया वर फोटो काढून देणाऱ्या फोटोग्राफरची आणि टिपिकल गुजराथी घरात वाढलेल्या सीए आणि मग परदेशी लग्न असं चौकटीतलं विश्व असणाऱ्या हुशार पण बंदिस्त मिलोनीची (सान्या मल्होत्रा). प्रेमकथा या टिपिकल बॉलिवूड कन्सेप्टला तडा देणारी ही गोष्ट.. दोघांचे दोन वेगळे विश्व.. चार जणांच्या बरोबर एक रूम शेयर करणारा रफी, वडिलांच्या मृत्यू नंतर लोन घेऊन दोन मोठ्या बहिणींची लग्न धुमधडाक्यात करणारा, गेटवेच्या गर्दीत ‘सालों बाद यह फोटो देखोगे तो आपके चेहरे पे यही धूप दिखाई देगी’.. असं म्हणून पन्नास रुपयात गेटवे बरोबर ताज देणारा, प्रचंड इरिटेट करणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आजीवर प्रेम करणारा, सगळी मिळकत गावाकडे पाठवून वडिलांनी गहाण ठेवलेलं घर मिळवण्यासाठी धडपड करणारा.. आणि कपडे घेताना कुठल्या रंगाचे घ्यायचे इतकं साधं देखील जी ठरवू शकत नाही, सीए इंटरमध्ये टॉप करून मुंबईच्या एका क्लासच्या बोर्डवर नाव झळकवणारी, सीए आणि परदेशातला नवरा हेच जिच्या आयुष्याचं फायनल डेस्टिनेशन, अभ्यास, पुस्तकं यात जिचं आयुष्य कैद आहे, रोज तेच रुटीन, आनंद कशात आहे हे माहित नसणारी, स्वतःमध्ये न डोकवणारी.. मिलोनी.. यांच्या नात्याची ही गोष्ट.. बाकी चित्रपट जाऊन अनुभवावा असा..

या चित्रपटात मला आवडलेल्या खूप गोष्टी.. एकतर कुठलंही पात्र बिच्चारं वाटत नाही.. अमीर- गरीब, पॅशन- सेक्स, वो पेहला किस, फॅमिली ड्रमा, एक नोसेन्स कॉमेडी करणारं पात्र असल्या कोणत्याही मेलोड्रॅमॅटिक गोष्टी यात नाहीत.. साधी पात्रं, साधे कपडे.. बटबटीत मेकअप नाही, चमकधमक नाही आणि अतिरंजित किंवा अतिक्लेशकारक सीन्स नाहीत.. भावना पोहोचतात पण कमालीच्या हळुवार पद्धतीने.. दुःखाचा भडीमार, वियोग, आर्थिक दरी ह्या सगळ्या बोगस गोष्टींपासून दूर.. कॅम्पाकोलाचा शेवटचा सीन सुद्धा खूप परिणामकारक… खूप आर्त, आतून ढवळून टाकणारा, सूक्ष्मसा आशावाद निर्माण करणारा आणि तरीही डोळे भिजवणारा.. एडिटींग ही सुद्धा अत्यंत जमेची बाजू.. कमीत कमी संवादात कॅमेरा काय कमाल दाखवू शकतो याचं उत्तम उदाहरणं.. गीतांजली कुलकर्णीची रामप्यारी.. मिलोनीकडे राहणारी मदतनीस.. कमाल काम.. तिच्या पायातल्या पैंजणापासून ते तिच्या डोळ्यातल्या खिन्न हास्यापर्यंत.. कमाल.. गीतांजली कुलकर्णी ही तशीही नट- नट्या यांच्या टिपिकल चौकटी मोडणारी.. एका छोट्या भूमिकेत ऍक्टर काय कमाल करू शकतो याचं उत्तम उदाहरणं.. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी या चित्रपटांत आहेत.. बघाल तर महत्वाच्या आणि लक्ष नाही दिलंत तर कायमच्या सुटून जाणाऱ्या.. काहीसं आपल्या स्वतःच्या आयुष्यासारखं.. कुठे बघायचं,काय बघायचं आणि काय सोडून द्यायचं.. हे सर्वस्वी आपल्यावर असतं. एकच आयुष्य दोन वेगळ्या दृष्टीकोनाची माणसं वेगवेगळ्या पद्धतीने जगतात.. तसंच काहीसं…

चित्रपटाची मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा शेवट.. चित्रपट संपला.. लाईट लागले.. तरीही पंचवीस डोकी हालेनात.. खत्म हो गया?? असं आमच्या पुढची ललना पेप्सी गटकावत आपल्या जोडीदाराला विचारतं होती.. मला तर हे या चित्रपटाचं खरं यश वाटतं.. एकतर शेवटाला का कोणास ठाऊक कथानकात अनन्य साधारण महत्व असतं.. एरवीच गोष्टीचा शेवट खूप महत्वाचा होऊन जातो.. आणि ती दोघं सुखाने नांदू लागले किंवा त्यांची ताटातुट झाली.. किंवा कोणीतरी एक मेलं आणि दुसरा टिपं गाळत बसला.. याची आपल्याला खूप सवय झाली आहे.. बात्रा सारखे मोजके दिग्दर्शक या चौकटी मोडणारे.. प्रेक्षक म्हणून, माणूस म्हणून आपल्याला काही गोष्टी डी-लर्न करायला लावणारे… चित्रपट संपला तेंव्हा चेहऱ्यावर पाहिलं उमटलं ते हसू आणि मग डोळ्यात तरळलं ते पाणी.. त्यानंतर त्यावर तासभर शर्माजींबरोबर डिस्कशन.. आयुष्याकडे असलेल्या दृष्टीकोनाप्रमाणे आपण या शेवटाचा अर्थ लावू शकतो.. म्हटलं तर गोष्ट संपली, म्हटलं तर सुरु झाली.. म्हटलं तर वियोग म्हटलं तर साथ.. आणि म्हणूनच हा चित्रपट आपल्याला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी देतो.. करमणूक वगैरे यांच्या पलीकडचं आहे हे..

आयुष्यात येणाऱ्या कित्येक घटना आपण ठरवलं तर नुसत्या बघू शकतो, बघून न बघितल्या सारख्या करू शकतो, जगून सुद्धा अनुभवू शकत नाही आणि न जगून सुद्धा अनुभवू शकतो.. हे जे काही आहे ना.. अलगद, अलवार.. मनाच्या तळात पोहोचू शकणारं.. यासाठी आपलं मन नितळ आहे का हे सुद्धा चाचपून बघायला हवंय. पाणी गढूळ असेल तरीही हरकत नाही.. ते पुन्हा एकदा स्वच्छ करायला हवं.. आपण कशाकरिता जगतो आहोत, कोणत्या चौकटींमध्ये स्वतःला बांधून ठेवतो आहोत, जे दिसतो ते आहोत का आणि जे आहोत ते दिसतो का. आत्मभान, अंतर्मन जिवंत आहे का.. अशा कित्येक गोष्टी चाचपडून बघायला लावतो.. हा फोटोग्राफ..

असा एक फोटो मनात जतन करायला हवाय.. जो काळ, वेळ. सुख- दुःख, प्रेम, वासना, पैसे, नाती, नीती- अनिती या सगळ्यांपलीकडे आपल्याला घेऊन जाईल.. आयुष्याची गती धीमी करून स्वतःला स्वतःमध्ये डोकावण्याची संधी देईल आणि मग चेहेऱ्यावर एक हसू उमटेल.. न विझणारं.. न संपणार..
Cheers to photograph.. Cheers to seeing Beyond frames…

Photograph_(2019_poster)

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , , , | Leave a comment

लेस्बिएनिझमचे भयानक वास्तव..ek ladkiko dekha toh aisa laga…

काही चित्रपटांबद्दल लिहिणं गरजेचं होऊन जातं कारण चित्रपटाच्या निमित्ताने जो विषय हाताळला जातो त्यावर खुलेपणाने चर्चा होणं आणि तो विषय पोहोचणं महत्वाचं असतं आणि म्हणून ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटावर लिहिणं गरजेचं. या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कथानकातल्या काही गोष्टी मी उघड केल्या आहेत कारण मला ज्या मुद्द्यावर या निमित्ताने लिहायचं आहे ते त्याशिवाय शक्य नाही म्हणून हा स्पॉयलर अलर्ट. आपल्याकडे लेस्बियन रिलेशनशिप्सवर तसे फार कमी चित्रपट आहेत आणि त्यातले मोस्टली गर्ल ऑन गर्ल ऍक्शन या टॅग ला जागणारे असल्याने एकूणच मूळ मुद्दा बाजूला सारणारे. ‘एक लड़की को’ मध्ये जाणीवपूर्वक असे सीन्स टाळून शक्य त्या सेंसिबिलीटीने लेस्बियन रोमॅन्स हाताळल्या बद्दल दिग्दर्शक शेली चोप्रा धार चे कौतुक.. हं सेकंड हाफ अतिशय मेलोड्रॅमॅटिक, प्रेडिक्टेबल, क्लिशेड आणि थोडा बटबटीत आहेच पण कमर्शियल बॉलिवूड चित्रपटात होरीइन चक्क तथाकथित हिरोच्या प्रेमात न पडता चक्क दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असते आणि हिरो ते प्रेम पूर्ण करण्यास मदत वगैरे करतो ही ष्टोरी मोठ्या पडद्यावर बघणं हे नक्कीच आशादायक आहे. राजकुमार राव, अनिल कपूर आणि माईंड शेटेरिंग जुही चावला आवडले.

मूळ मुद्दा जो मला जाणवला तो म्हणजे एकूणच आपण समाज म्हणून गे कपल्स बाबत थोडे फार का होईना लिबरल होत आहोंत पण लेस्बियन नात्यांबाबत अजूनही मनात अढी जास्त जाणवते. गंमत म्हणजे पॉर्न बघताना गर्ल ऑन गर्ल, ग्रुप गर्ल सेक्स, थ्रीसम, लेस्बियन एक्शन बघणारा फार मोठा प्रेक्षक वर्ग प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अशा नात्यांना नावं ठेण्यापलीकडे काहीही करत नाही. एकूणच LGBT कम्युनिटीमधल्या सर्वात जास्त घाणेरड्या व संकुचित नजरेने बाहेरच्या समाजातल्या सो कोल्ड स्ट्रेट लोकांकडून ज्या नात्याला बघितलं जातं ते म्हणजे दोन मुलींमधलं नातं. मुलींमधले शारीरिक चाळे चवीने बघणाऱ्या लोकांचा वाईडर माइण्डसेट जेंव्हा याच दोन मुलींमध्ये सहज फुलणाऱ्या प्रेमाकडे बघताना इतका सडका आणि संकुचित कसा होतो याचं आश्चर्य वाटत राहतं.

एक गंमत म्हणून सांगते.. काही महिन्यांपूर्वी मी आणि अनाद्या कोथरुडमधल्या एका बागेत खेळत होतो. गवतावर बसलो असताना सहा वर्षाच्या माझ्या चिमुरडीने एकदम मला विचारलं … ‘आई फक्त बॉय आणि गर्ल प्रेम करून मग लग्न करू शकतात का? यावर मी हसून तिला म्हणाले.. सगळ्यात पहिले तर प्रेम असेल तर लग्न केलंच पाहिजे असं गरजेचं नाही आणि लग्न मुलगा आणि मुलगीच करू शकतात असं गरजेचं नाही.. आपल्या आवडीला, प्रेमाला कोणताच निर्बंध नको ना.. पिल्लू ओके म्हणून खेळायला गेलं पण माझ्या बाजूला बसलेली एक आई मात्र तिच्या मुलीला तिथून माझ्याकडे एक खास तिरकस कटाक्ष टाकून निघून गेली.. एकदम मला खूप गंमत वाटली…

समलैंगिकता हा एक मानसिक वा शारीरिक आजार आहे असं मानणारा प्रचंड मोठा वर्ग आजही आहेच.. अगदी सो कोल्ड शिकले, सवरलेले, मॉडर्निझमचे बुरखे पांघरणारे लिबरल लोक त्यांच्या स्वतःच्या घरात, नात्यामधल्या लोकांच्या बाबतीत हाच लिबरल अप्रोच ठेवतात हा कळीचा मुद्दा आहे. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा असा विचार करणारा पांढरपेशा वर्ग.. आपण जेंव्हा बदलाची भाषा करतो, मानसिकता बदलावी असं आपल्याला वाटतं तेंव्हा त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. निदान आपल्या मुलांना तरी एका पोषक, सुदृढ आणि सजग विचारसरणीच्या समाजात वावरता यायला हवं आणि हा समाज तुमच्या माझ्या सारख्या लोकांनीच तर बनणार आहे.

प्रेम करताना ते जेंडरच्या पलीकडे जायला हवंय. हे स्ट्रेट, गे, लेस्बियन, बायसेक्शुअल वगैरे वर्गीकरणांची सुद्धा गरज नको पडायला. आपलं सेक्शुअल ओरिएन्टेशन जसं आहे जे आहे ते नॉर्मलच आहे असं त्या व्यक्तीला वाटणं गरजेचं. समलैंगिकता नैसर्गिक नाही असं म्हणून आतल्या उर्मींना दाबू पाहणारा समाज खरंतर अनैसर्गिक. यातून जाणाऱ्या लोकांचे काय हाल होतात हे आपल्या चौकटीत रमणाऱ्या मनाला ठाऊक देखील नसतात. आपण नॉर्मल नाही, आपल्यात काहीतरी बिघाड आहे आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांची नालस्ती होईल या भीतीपोटी न्यूनगंड बाळगून आतून विझून गेलेले कित्येक लोक आहेत. लेस्बियन रिलेशनशिप्स तर अजूनच अवघड प्रकरण कारण जिथे मनासारख्या पुरुष प्रियकराबरोबर राहता येणं हेच अशक्य आहे तिथे मला मुलीबरोबर राहायचं आहे हे तोंडातून बाहेर काढणं म्हणजे महा भयंकर पाप..

प्रेम केवळ प्रेम असतं.. साथ केवळ साथ.. दोन जीवांनी एकत्र येणं, प्रेम करणं, एकमेकांच्या सुख- दुःखात साथ देणं, एकमेकांचं मन जपणं, प्रेमावर निष्ठा असणं हे वाईट असू शकतं का? वरवरून चकचकीत दिसणारं पण आतून मृत झालेल्या नातं… आपल्या आंतरिक उर्मींशी प्रतारणा.. मन मारून जगणं.. स्वतःला कोशात अडकवणं.. नैतिकता आणि अनैतिकतेच्या कुचकामी झालेल्या चौकटी.. शेवटी माणूस निवडतोच काय ते पण निदान स्वतःच्या घरात शिवाजी नको असं जर सगळ्यांनी म्हटलं असतं तर स्वराज्य मिळालं असतं का? बदल हवा असल्यास सुरवात स्वतःपासून का करू नये.. आपल्या कक्षा रुंदावून बघूया.. जग सुदंर आहेच.. त्याला तसंच राहू देऊया.. Cheers to accepting yourself the way you are..Cheers to love that is beyond all boundaries…

Ek_Ladki_Ko_Dekha_Toh_Aisa_Laga_poster

 

 

Posted in Not A movie Review!! | Tagged , , , | Leave a comment

साथ

साथ म्हणजे नक्की काय असते? एकमेकांबरोबर असणं म्हणजे साथ ,की एकमेकांबरोबर नसताना सुद्धा जी सोबत राहते ती साथ? जे बोलूनही समजत नाही आणि न बोलताही पोहोचतं.. उघड्या डोळ्यांना दिसत नाही आणि पापण्या मिटल्या की संपूर्ण चित्र उभं राहतं..कानांना ऐकू येत नाही पण आत्म्यामध्ये झिरपत जातं…असून नसणं आणि नसून असणं असं जे काही असतं.. आहे पण नाहीये.. आणि नाहीये पण आहे.. शेवटी असणं म्हणजे काय असतं? मनाच्या तळघरात सुगंध दरवळत राहतो.. तो दिसत नाही.. जाणवतो..’जाणीव’ म्हणूनच गंमतशीर गोष्ट.. म्हंटली तर आहे आणि म्हंटली तर नाही.. तसंच काहीसं मिळणं आणि असणं यातला फरक.. मिळालेलं सगळंच असतं असं नाही आणि असलेलं सगळंच मिळतं असंही नाही..

एकमेकांबरोवर न राहताही जी साथ कायम असते.. त्या साथीला वियोग स्पर्शसुद्धा करू शकत नाही. जे दिसत नाही ते नसतं या चौकटीपलीकडच्या गोष्टी… शहाणपणाच्या फ्रेमवर्कमध्ये न बसणाऱ्या.. असणाऱ्या गोष्टींना न मानणाऱ्या आणि नसणाऱ्या गोष्टींचं अस्तित्व जपणाऱ्या.. वेड्या लोकांच्या वेड्या गोष्टी.. खूप साऱ्या.. मोजता न येणाऱ्या भावना.. शब्दांत बंद न करता येणाऱ्या.. काहीही न बोलता,मागता साथ देणाऱ्या.. नसून असणाऱ्या. असण्यासाठी त्यांना कशाचीही गरज लागत नाही.. म्हणूनच ती नसून असणारी साथ..

रहती है साथ साथ कोई ख़ुश-गवार याद
तुझ से बिछड़ के तेरी रिफ़ाक़त गई नहीं…
(रिफ़ाक़त- साथ, सोबत, companionship )
– ख़ालिद इक़बाल यासिर

#randomthoughts
©सानिया भालेराव

Posted in Random Thoughts, Uncategorized | Tagged , , , , | Leave a comment

कातर वेळ

संध्याकाळला ‘कातर वेळ’ का बरं म्हणत असावेत? एक वेगळीच हुरहूर लागून राहते. नक्की काय ते सांगता येणं कठीण. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर असतो. सूर्य मावळताना का कोणास ठाऊक आतून उन्मळून आल्या सारखं होतं.. खूप काहीतरी आत तुटतंय असं.. दिवसभर तळपणारा सूर्य सरतेशेवटी मावळतोच. जे सुरु होतं त्याला अंतही असतोच हेच सांगू पाहत असतो का तो? की दिवसाची सुरवात उजाडण्यापासून आणि शेवट मावळण्याकडे हे शाश्वत सत्य आहे तो दाखवू पाहतोय?

उगवताना हात जोडणारे लोक मावळताना पाठ फिरवतात.. मावळत्या दिनकरा.. भा. रा. तांबेंची कविता..लहानपणापासून आवडणारी.. उगाच इतक्या लवकर उमजली.. . मन उदास होतं आहे.. संध्याकाळ का असते इतकी जीवघेणी? की आपल्या मनाचे खेळ आहेत हे? कामं असली की काही सुचत नाही असं भलतं सलतं.. रिकाम्या मनाचे उद्योग सगळे.. म्हणतात असं लोक.. खरं असावं का ते? सकाळी उठल्या पासून घडाळ्याच्या काट्यावर पळणारं आयुष्य..काम, धावपळ, टार्गेट्स.. निजतांना असतात का हे कामसू लोक शांत? तेंव्हा नसेल का मन काहीबाही विचार करत की थकून जात असेल ते प्रेशरने.. कामाच्या, अपेक्षांच्या? आम्हाला श्वास घ्यायलाही फुरसत नाहीये.. यात समाधान मानायचं की स्वतःची कीव करायची? खूप बिझी असलो तरी संवेदनशीलता मरून जाते का मनाची? का अधिक एकटं पडत जातं मन की सारवासारव करण्यात तरबेज होऊन जातात लोक? काहीही न वाटणं, प्रॅक्टिकल असणं कुल असतं का की मनाच्या जखमांना घेऊन जगत राहणं, पुन्हा स्वतःच्या पायांवर उभं राहणं कुल असतं?

सूर्य आता पुरता बुडाला आहे.. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत आहेत.. दिवस मावळेल.. उद्या परत तेच… हे असंच असतं.. चक्र फिरत राहणार.. वेड्या लोकांची मन कुरतडून निघणार.. सोलली जाणार… अस्वस्थ होत राहणार.. जखमा होत राहणार.. त्या वाहत राहणार.. शहाण्या माणसांचं मन सेफ राहणार.. ते स्वतःला कोणत्याच गोष्टीने त्रास करून घेणार नाही.. त्यांचं मन अस्वस्थ होणार नाही.. छळलं जाणार नाही.. त्याला साधासा ओरखडापण पडणार नाही.. कालांतराने शहाणी माणसं आपल्याला मन आहे हेच विसरून जातील आणि ती अजून शहाणी होतील.. याउलट वेड्या लोकांची मनं लुकलुकतं राहतील आणि ती कायम जिवंत राहतील.. सूर्य मावळेल.. शहाणी माणसं आपली कामं संपवून घरी जायला निघतील.. खिश्यात, अकाउंटमध्ये काय काय जमा केलं, काय काय उणे झालं याचे हिशोब लावत बसतील.. वेडी माणसं मावणळणाऱ्या सूर्याला एकटक पहात बसतील..त्यांचा सगळाच कारभार बेहिशोबी.. डबडबलेल्या डोळ्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या पाण्याला निकराने रोखण्याचा असफल प्रयत्न करतील.. मनाच्या जखमांना थोड्या वेळ मोकळी हवा लागू देतील आणि मग आपल्या धडधडणाऱ्या वेड्या मनाला घेऊन परतीची वाट धरतील..

©सानिया भालेराव

 

Posted in Random Thoughts | Tagged , , , , | Leave a comment

पसारा

‘पसारा’ आवरताना नेहेमी वाटतं केवढा हा डोंगर!! किती वेळ वाया चालला आहे आवरताना. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवताना जीव नकोसा होतो. वाटतं गोष्ट हातात घेतली आणि वापरून झाली की लगेच का नाही जागच्या जागी ठेवत आपण? किती नि काय काय उराशी घेऊन जगत राहतो आपण? नीट आवरलेली,मोजक्या गोष्टी असलेली वास्तू किती छान वाटते . प्रत्येक वेळी आवरताना स्वतःला बाजवलेलं असतं कशाला हवंय इतकं सामान.. आता काही नवीन आणायचं नाही.. पण परत मोह जडत जातो.. मन अडकत जातं.. सामान वाढत जातं आणि पसाराही होतच जातो..

पसारा फक्त वस्तूंचाच नसतो. भावनांचा, माणसांचा, मनाचा, श्रद्धेचा, खुळेपणाचा, प्रेमाचा, दुःखाचा,जाणिवांचा, संवेदनांचा, नात्यांचा ..किती आणि काय काय पसारे असतात..आपणच करत असतो तो.. स्वतःच्याही नकळत.. अडकतो, अडखळतो, गुदमरतो,घुसमटतो, ठेचाळतो, लंगडतो, सरपटतो,चालतो, पळतो, उडतो, डोळे,कान, नाक, मन .. बंद करतो.. पण पसारा होतोच .. कित्येकदा या पसाऱ्याकडे नेणाऱ्या वाटा ओळखीच्या झाल्या असतात तरीही आपण त्याच वाटेवरून पुन्हा चालतो.. तर कधी वाट बदलून सुद्धा बघतो पण तरीही हा पसारा काही पाठ सोडत नाही.. एव्हाना पसारा आवरायची सवय झाली असते आपल्याला. त्रास होत नाही असं नाही पण सरावलेलो असतो आपण आता.

मनाच्या एका कोपऱ्यात बसून एकटक बघितलं ना या पसाऱ्याकडे तर शेकडो निरर्थक भावना निपचित पडलेल्या दिसतील .. काही घरंगळत आतवर पोहोचलेल्या, काही काठावर बसून आपल्याला वेडावत बसलेल्या, काही हट्टीपणाने काळजात रुतून बसलेल्या तर काही डोळ्यातून वाहायला बघणाऱ्या .. सगळी गिचमिड नुसती.. मग एक एक करत आपण त्यांना जागेवर ठेऊन द्यायला लागतो. वेगवेगळ्या कप्यांमध्ये त्यांना बसवणं सोपं नसतं पण शिकत जातो आपण..पसारा करायलाही आणि मग तो आपला आपण आवरायलाही.. काही जागा सापडतात काही नाही सापडत..मग त्या पसाऱ्याचं एक गाठोडं घेऊन कधी कधी फिरावं लागतं.. आपलं गाठोडं.. आपला भार.. मग सवय होते.. ताठ कण्याने आपलं गाठोडं घेऊन चालण्याची..

#Randomthoughts
©सानिया भालेराव

Posted in Random Thoughts, Uncategorized | Tagged , | Leave a comment

उतू जाण्याच्या जागा..

पाणी उकळताना कधी नीट पाहिलं आहे? सुरवातीला अगदी शांत स्थिर असलेलं भांड्यातलं पाणी. अगदी बेसावध .. निश्चल.. मग जस जशी धग वाढते तस तशी पाण्याला उष्मा जाणवायला लागते. हळू हळू त्या भांड्याच्या तळाशी अगदी नाजूक छोटे छोटे बुडबुडे यायला लागतात.. पाणी सणसणतं…तळाशी आता बारीकशी उकळी फुटते आणि खालून वर एका लयीत उकळ्या फुटायला लागतात.. आच मंद करावी लागते कारण पाणी आता पुरतं खवळलेलं असतं. ते बाहेर पडू पाहत असत. आणि अगदी याच क्षणी विस्तव विझवल्या जातो.

हळूहळू तापत जाणं, अनावर होणं आणि जेंव्हा सगळं बाहेर पडू पाहतय असं वाटतं तेंव्हाच शांत व्हायला लागणं.. सगळं दाटून आलेलं बाहेर न पडणं.. ते पुन्हा आत सामावून घेणं.. दूध कसं उतू जायच्या आधी वर येतं.. अगदी काठोकाठ वर येणारं दूध.. त्याला वाटत असतं मी आता बाहेर पडणार.. मोकळं होणारं पण इतक्यात आपण विस्तव विझवतो आणि त्याला तसंच अर्धवट सोडतो.. मग ते वर आलेलं दूध गुमानं खाली येतं.. आत्मभान सांभाळत मनात येणारं ते उफान रोखून, त्याला काबूत ठेवून फसफणाऱ्या मनाचा परत निश्चल होण्याचा हा प्रवास..

असतात असे काही प्रसंग, माणसं, नाती, जखमा.. जी वरवर शांत वाटणाऱ्या मनाला बेभान करतात..विस्तवाप्रमाणे काम करतात आणि आठवणी, प्रेम, वेदना, दुःख, हसू, आनंद सगळेच कसे मग फ़सफ़सुन बाहेर यायला बघतात.. आपणच मग शहाणपणाचं बटण चालू करायचं आणि विस्तव विझवायचा.. नाहीच येऊ द्यायचं बाहेर.. उतू जायचं नसतं असं नेहेमी.. कारण उतू गेल्यावर जो फाफट पसारा होतो, वाहवत गेल्याचे ओघळ, घरंगळत गेल्याच्या खुणा.. ते सगळं साफ करणारं हवं न कोणीतरी.. नाहीतर मग कायम स्वरूपी डाग, खुणा पडून राहतात.. म्हणूनच उतू जाण्याच्या सुद्धा काही खास जागा असतात. त्या जागा उमजल्या पाहिजे आणि त्या जागांची खासियत जपली देखील पाहिजे.

#randomthoughts
©सानिया भालेराव

Posted in Random Thoughts | Tagged , , | Leave a comment

‘नयनतारा सहगल’ यांचं मराठी साहित्य संमेलनातील आमंत्रण रद्द करणं लज्जास्पद.. या कृत्याचा निषेध!

‘नयनतारा सहगल’ या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार ही मला फार आशादायक बाब वाटली होती. ‘रिच लाईक अस’ या पुस्तकासाठी त्यांना १९८६ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. देशातल्या वाढत चाललेल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधात आवाज उठवण्यासाठी आपला हा पुरस्कार परत करणाऱ्या निर्भीड लेखकांपैकी या एक! अभिव्यक्ती स्वात्रंत्र्यावर घालण्यात येणारे निर्बंध, मॉब लिचिंग, विचारवंतांच्या हत्या आणि अशा अनेक सोशल प्रश्नांबाबत स्पष्ट मतं असलेल्या आणि आपली मतं परखडपणे मांडणाऱ्या नयनतारा सहगल या उदघाट्न सोहळ्यात भाषणबाजी करून वातावरण गढूळ (?) करतील की काय या भीती पोटी आणि राजकीय गोंधळ टाळण्यासाठी त्यांचं हे आमंत्रण रद्द करण्यात आलं म्हणे!

यावर नक्की हसावं कि रडावं अशा संभ्रमात मी पडले आहे कारण यांच्या उपस्थितीला रोखण्यासाठी जी काही राजकीय आणि सामाजिक कारणं पुढे करण्यात आली ती फार रंजक वाटली मला. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी साहित्यिकास कसं निमंत्रित केलं हा पहिला आक्षेप. आज जग जवळ आलं आहे, भाषा,जात धर्म याच्या कक्षा पुसटश्या होत असताना ‘भाषिक अस्मितेचं’ तेच ते पीठ किती काळ आपण दळणार आहोत? साहित्याला भाषेची बंधन कित्ती वर्ष अजून लावणार आहोत? आपल्या गढूळ डबक्यांबाहेर कधी पडणार आहोत?

तसंच भाषणात ‘ही बाई’ काही बाही बोलली तर राजकीय अस्थिरता निर्माण होईल या भीतीपोटी हिचं बोलावणं रद्द करूया हे तर अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांच्या भाषणातले काही मुद्दे बीबीसीच्या एका न्यूज मध्ये दिले आहेत आणि या अशा प्रकारच्या मुस्कटदाबीचा तीव्र निषेध होण्याची गरज आहे. संमेलनाला आमंत्रित केलेल्या काही जणांनी या गोष्टीचा निषेध म्हणून आमंत्रण नाकारणं हे आशादायक आहेच. मी लेखक आणि लेखिका असा भेद करत नाहीच पण या जागी जर कोणी पुरुष असता तर हे ‘येऊ नका’ असं इतकं सहज सांगता आलं असतं का? असा प्रश्न मात्र मला पडला आहे.लेखणीचा वापर करून, आमंत्रण नाकारून, या बद्दल मत व्यक्त करून शक्य आहे त्या प्रकारे आपला निषेध नोंदवणं गरजेचं आहे.

बाकी एका स्त्रीच्या भाषणाला असं घाबरावं… मग जमेल ती कारणं देऊन तिला बोलू न द्यावं हा स्त्रीच्या अंगी दडलेल्या शक्तीचा मी विजय मानायचा की पराभव याचं उत्तर शोधते आहे. आज इतकी वर्ष झाली शेवटी जेंडर मध्ये येतंच आहे. जे भाषेच्या, रिजनॅलिझमच्या,जातीच्या, धर्माच्या, राजकारणाच्या पलीकडचं असतं ते साहित्य आणि जो हे आपल्या लेखणीने सार्थ करतो तो लेखक.. या दोनीही बाबीत सपेशल फसलेल्या, राजकीय चिखलात बरबटून निघालेल्या, व्यक्ती स्वातंत्र्याच्या चिंध्या करणाऱ्या, परखडपणे आपली मतं मांडणाऱ्या स्त्रीला टरकून तिचा अनादर करणाऱ्या, हार – तुरे- मानचिन्ह- पाकिटं- शाल- श्रीफळ या सारख्या दिखाव्यामध्ये अडकून पडणाऱ्या, स्त्री लेखकांची मुस्कटदाबी करणाऱ्या आणि भाषा- साहित्य व लेखणी या सगळ्याची किंमत शून्य करणाऱ्या या आगामी मराठी साहित्य संमेलनाला खूप साऱ्या शुभेच्छा!

‘फैज़’ कितने साल पहले आप यह कहके गए थे.. कब समझेंगे हम?

बोल कि लब आज़ाद हैं तेरे
बोल ज़बाँ अब तक तेरी है
तेरा सुत्वाँ जिस्म है तेरा
बोल कि जाँ अब तक तेरी है

देख कि आहन-गर की दुकाँ में
तुंद हैं शोले सुर्ख़ है आहन
खुलने लगे क़ुफ़्लों के दहाने
फैला हर इक ज़ंजीर का दामन

बोल ये थोड़ा वक़्त बहुत है
जिस्म ओ ज़बाँ की मौत से पहले
बोल कि सच ज़िंदा है अब तक
बोल जो कुछ कहना है कह ले

– फैज़ अहमद फैज़

*नयनतारा सहगल यांच्या भाषणावरून जो गदारोळ चालू आहे त्याबाबत बीबीसी मराठी ने एक आर्टिकल नुकतंच पब्लिश केलं आहे. त्यात माझं यावरचं मत देखील घेतलं छापलं आहे. लिंक सोबत देते आहे. जरा राजकारण बाजूला ठेवून याकडे बघता येतंय का हा प्रयत्न करून बघूया.

https://www.bbc.com/marathi/india-46778250?fbclid=IwAR2SxyglEBGd5QxbHV8_FQ6s4wDkJbeUftPLqOfy2Enj6TSGeRs7gF8qVaE

 

Posted in Uncategorized | Tagged , , , | Leave a comment